(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
वाशिष्ठी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे घडली. मगरीने पायाला पकडून महिलेला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने आईचा हात घट्ट पकडून तिला पाण्याबाहेर खेचले आणि आईचा जीव वाचवला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी कुटुंबीयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
नंदिनी भूपेंद्र पवार (३४) या गुरुवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतानाच दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्या पायाला पकडले. काही कळायच्या आत मगरीने त्यांना पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. अचानक ओढले गेल्याने नंदिनी यांचा जीव अक्षरशः धोक्यात आला. आईवर आलेले संकट पाहून त्यांच्यासोबत असलेल्या दहा वर्षांच्या स्वर्णाने क्षणाचाही विलंब न करता आईचा हात पकडला. स्वतःची सर्व शक्ती पणाला लावत तिने आईला पाण्याबाहेर खेचले. चिमुकल्या मुलीच्या या धाडसामुळे मगरीच्या तावडीतून नंदिनी यांची सुटका झाली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या हल्ल्यात नंदिनी यांच्या पायाला खोल जखम झाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. जखम पूर्णपणे भरून येण्यासाठी किमान १५ दिवस उपचार सुरू राहण्याची शक्यता असून, दररोज दोन हजार रुपयांहून अधिक खर्च होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेनंतर नंदिनी यांचे पती भूपेंद्र पवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी होणारा खर्च वन विभागाकडून मिळणे अपेक्षित असताना, घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मगरीच्या हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांनी कुटुंबीयांची भेट घेऊन चिमुकल्या स्वर्णाच्या धाडसाचे कौतुक केले. मात्र, कौतुकाचे चार शब्द पुरेसे आहेत का? प्रत्यक्षात गंभीर जखमी महिलेच्या उपचारासाठी दररोज हजारो रुपये खर्च होत असताना मदतीचा हात मात्र अद्याप पुढे आलेला नसल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. वाशिष्ठी नदीच्या पात्रालगत मगरींचा वावर असल्याची बाब नवीन नाही. असे असताना नागरिक नियमितपणे नदीकाठी जात असतील, तर मगरींच्या संभाव्य हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमक्या कुठे आहेत? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी सूचना फलक, सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाय, नागरिकांमध्ये जनजागृती आणि मगरींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर पंचनामा, मदत आणि कागदोपत्री प्रक्रिया सुरू करण्याऐवजी दुर्घटना घडूच नये यासाठी प्रशासनाने आधीच जागे होणे गरजेचे आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
घटनेची वन विभागाने नोंद घेतली असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मदतीबाबत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वन अधिकारी सरवर खान यांनी दिली. दरम्यान, आईला मगरीच्या जबड्यातून खेचून बाहेर काढणाऱ्या दहा वर्षांच्या स्वर्णाच्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, या धाडसी घटनेतून प्रशासनाने धडा घेत नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

