(गणपतीपुळे / वैभव पवार)
आषाढी एकादशीचे औचित्य साधत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे ‘आषाढी दिंडी सोहळा’ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या दिंडी सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत केंद्र शासनाच्या ‘नवभारत साक्षरता अभियान’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची प्रभावी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
सकाळी शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाख परिधान करून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, हातात टाळ-मृदंग घेऊन अभंग गाणारे विद्यार्थी तसेच विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषेतील बालचमू यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ग्रामस्थांनी या चिमुकल्या वारकऱ्यांचे कौतुक करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यंदाच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल भक्तीबरोबरच ‘नवभारत साक्षरता अभियान’ या राष्ट्रीय उपक्रमाची प्रभावी जनजागृती. विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व सांगणारे विविध संदेशफलक हातात घेत गावातून फेरी काढली. या माध्यमातून शिक्षण, साक्षरता आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
‘विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा – वसा घेतला साक्षरतेचा’, ‘अबीर-गुलाल उधळीत रंग, नवभारत साक्षर करण्यात आम्ही दंग’ अशा घोषवाक्यांनी सजलेले फलक आणि विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दिंडी अधिक आकर्षक ठरली. या संदेशांमुळे धार्मिक उत्सवातून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देण्याचा शाळेचा प्रयत्न यशस्वी ठरला.
श्री चव्हाटेश्वर मंदिर ते प्राथमिक शाळा या मुख्य मार्गावरून निघालेल्या दिंडीचे गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी व जयघोषात स्वागत केले. पालक आणि विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते सादर करत फुगड्या, फेर आणि रिंगण घालत वातावरण अधिक भक्तिमय केले. चिमुकल्या वारकऱ्यांच्या निरागस भक्तीने आणि उत्साहाने उपस्थितांची मने जिंकली.
या अभिनव उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि केंद्रप्रमुख मिनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे तसेच सहकारी शिक्षिका पुनम कुलकर्णी यांनी केले.
दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा विकास समिती तथा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, सदस्य उदय रहाटे, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, अंगणवाडी मदतनीस समीक्षा घवाळी यांच्यासह रिया तांबटकर, रुणाली तांबटकर, वेदिका धनावडे, समीक्षा तांबटकर, नुतन रहाटे, मानवी तांबटकर, वेदा कुर्टे, दिव्यता तांबटकर, अश्विनी कुर्टे तसेच पालक, समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांना आषाढी दिंडीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व तसेच नवभारत साक्षरता अभियानाचे उद्दिष्ट, गरज आणि समाजातील भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडला.
भक्ती, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची प्रभावी सांगड घालणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव रुजविण्याचा हा आदर्श उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

