(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यभरात अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धडक कारवाया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अद्याप एकही कारवाई न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी गुटखा, पान मसाला आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कारवायांचा बडगा उगारला जात असताना हे दोन्ही तालुके मात्र प्रशासनाच्या कारवाईपासून दूर का राहिले, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तथा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर नियमांच्या कठोर अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. गुटखा, पान मसाला आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रत्नागिरी शहरातील तीन दुकाने आणि कारवांचीवाडी येथील एक टपरी सील करण्यात आली आहे. खेड तालुक्यात बेकरी, किराणा दुकाने आणि स्वीट मार्टची तपासणी करण्यात आली असून संगमेश्वर तालुक्यात एक तर दापोली तालुक्यात दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. गुहागर तालुक्यात तपासण्या झाल्या असल्या तरी गुटखा आढळून आला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छता व अन्य त्रुटी आढळून आल्याने संबंधितांना सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी शहरातील काही बेकऱ्या, किराणा दुकाने आणि स्वीट मार्टमधून अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दुसरीकडे मंडणगड, लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून तपासण्या सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष कारवायांचा अभाव नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः गुटखा आणि पान मसाल्याची विक्री सर्वत्र सुरू असल्याच्या तक्रारी होत असताना या भागांमध्ये एकही कारवाई न होणे संशयास्पद वाटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने तपासणी मोहिमा आणि कारवायांमध्ये अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयात मनुष्यबळाचे कारण पुढे करून कारवायांतील मर्यादा कितपत ग्राह्य धराव्यात, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचा, विशेषतः लांजा आणि राजापूर तालुक्यांचा आढावा घेऊन अचानक भेटींद्वारे परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक त्या कारवायांना गती द्यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे.

