(लांजा)
दाभोळे-वाटुळ मार्गावरील शिपोशी गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी ७.३० वाजता झालेल्या अपघातात, भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षामधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षा (MH-05-EX-5186) मधील उमेश शिंदे, रुपेश नामदेव शिंदे, वैभव विश्वनाथ शिंदे, आणि आदेश खोत हे चौघे गंभीर जखमी झाले. तसेच रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभानवल्ली शिंदेवाडी येथील रिक्षा चालक उमेश नामदेव शिंदे (वय ३७) हे प्रभानवल्लीकडे रिक्षा घेऊन जात असताना, कुडाळहून दाभोळेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार (MH-07-AS-0643) ने रॉंग साईडने येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली. स्विफ्ट कार पर्शुराम राजेंद्र तिरोडकर (वय ३२, रा. कुडाळेश्वर मंदिराजवळ, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) हे चालवत होते.
या घटनेप्रकरणी लांजा पोलिसांनी पर्शुराम तिरोडकर यांच्याविरोधात खालीलप्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.