(लांजा)
तालुक्यातील केळंबे येथील अमृतसृष्टी, नामदेव नगर परिसरात घरफोडीची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे, या घरफोडीमागे पीडिताचा सख्खा मेहुणाच असल्याचे समोर आले आहे. या प्रकारात सुमारे ३ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. नातेसंबंधामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फिर्यादी युवराज गणपती जाधव (रा. अमृतसृष्टी, नामदेव नगर, केळंबे, मूळ रा. कर्नाटक) हे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता बेळगावला गेले होते. दुसऱ्या दिवशी ५.३० पर्यंत त्यांचे घर बंद होते. याच दरम्यान, त्यांचा सख्खा मेहुणा राज नारायण राठोड (२४, रा. केळंबे, मूळ रा. कर्नाटक) याने संधी साधत घरात प्रवेश केला. राज राठोड याने घरातून सोन्याच्या तीन अंगठ्या (किंमत ४१ हजार १५०), १५ हजार किमतीचा विवो ५जी मोबाईल फोन, तसेच २ लाख ८० हजार रोख रक्कम, असा एकूण ३ लाख ३६ हजार १५० चा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
जाधव हे घरी परत आल्यानंतर चोरी लक्षात आली. मात्र आरोपी नात्यातील असल्याने तो परत येईल, या आशेने काही दिवस वाट पाहण्यात आली. मात्र राज राठोड परत न आल्याने फसवणुकीची खात्री पटल्यावर, अखेर १७ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या फिर्यादीवरून राज राठोडविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.