(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहराजवळील शिरगाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा शिरगाव यांच्या वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) प्रज्ञा बुद्ध विहार, शिरगाव येथे उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्यदिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य’ या विषयावर डॉ. आयु. स्वप्निल काशिनाथ कांबळे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना डॉ. आयु. स्वप्निल कांबळे, आयु. साहिल कांबळे, आयु. आयुष जाधव, आयु. वीर कांबळे, आयु. योगिनी कांबळे आणि आयु. सरिता कांबळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सूत्रपठणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना डॉ. स्वप्निल कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील व्यापक योगदानावर प्रकाश टाकला. भारताला केवळ ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्ती मिळावी, एवढ्यापुरती बाबासाहेबांची स्वातंत्र्याची संकल्पना मर्यादित नव्हती. प्रत्येक भारतीयाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळावे, त्याला समान अधिकार, प्रतिष्ठा आणि संधी प्राप्त व्हावी, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
परकीय सत्तेपासून मुक्ती मिळाल्यानंतरही जातिभेद, अस्पृश्यता, सामाजिक विषमता आणि अन्याय कायम राहिला, तर सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक समतेचा लढा आवश्यक आहे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. ब्रिटिश सरकारसमोर झालेल्या विविध समित्या व गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी विशेषतः वंचित समाजाच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांची ठामपणे मांडणी केली. मताधिकार, प्रतिनिधित्व, शिक्षण आणि समान संधी यांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. कामगारांच्या प्रश्नांबाबतही बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कामाचे तास, विश्रांती, कामगार कल्याण आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या विषयांवर त्यांनी धोरणात्मक पावले उचलली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या संकल्पनेला त्यांनी आर्थिक न्यायाची जोड दिली, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेला मजबूत आणि मूल्याधिष्ठित पाया दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये भारतीय राज्यघटनेच्या केंद्रस्थानी ठेवत त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण करणारी लोकशाही व्यवस्था उभारण्यास मोलाचे योगदान दिले. “देश स्वतंत्र झाला म्हणून प्रत्येक नागरिक स्वतंत्र झाला असे होत नाही; प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, प्रतिष्ठा आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वातंत्र्याची संकल्पना पूर्ण होत नाही,” या भूमिकेचा दाखला देत डॉ. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकताही अधोरेखित केली. यानंतर आयु. संजय कांबळे, बौद्धाचार्य, श्रामणेर व वरिष्ठ केंद्रीय शिक्षक यांनी डॉ. स्वप्निल कांबळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे कौतुक केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही आणि वंचितांच्या हक्कांच्या लढ्यातील सहभाग स्पष्ट करणारी विविध उदाहरणे देत उपस्थित धम्मबांधवांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रत्नदीप कांबळे यांनी विशेषतः तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. बाबासाहेबांनी केलेल्या प्रदीर्घ संघर्षाची जाणीव आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा तरुणांनी कायम जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डॉ. स्वप्निल कांबळे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शनाबद्दल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा शिरगाव यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. वर्षावास मालिकेतील या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा मिळाला आहे.

