(गुहागर / रत्नागिरी)
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या दोन पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेल्याने बुडण्याची वेळ आली. मात्र, कर्तव्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचेही प्राण थोडक्यात बचावले. चिपळूण येथील गफ्फार भट आणि झारखंड येथील हिरालाल कर्मली अशी बचावलेल्या पर्यटकांची नावे आहेत.
१५ ऑगस्टची सुट्टी असल्याने आठ पर्यटकांचा एक गट गुहागर समुद्रकिनारी आला होता. समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना गफ्फार भट आणि हिरालाल कर्मली हे दोघे पोहताना हळूहळू खोल पाण्याच्या दिशेने ओढले गेले. समुद्राच्या लाटांचा वेग आणि पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणांतच दोघेही बुडण्याच्या स्थितीत पोहोचले. ही गंभीर परिस्थिती समुद्रकिनारी सुरक्षेसाठी तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि साहिल तोडणकर यांच्या निदर्शनास आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. पाऊस सुरू असतानाच समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटा आणि खोल पाण्याची पर्वा न करता दोन्ही जीवरक्षकांनी बुडत असलेल्या पर्यटकांपर्यंत धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी दोघांनाही सुखरूपपणे किनाऱ्यावर आणले. जीवरक्षकांच्या या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि दोन पर्यटकांना अक्षरशः जीवदान मिळाले.
प्रदेश तांडेल आणि साहिल तोडणकर यांनी दाखविलेले धाडस, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विशेषतः पावसाळ्यात समुद्राच्या लाटांचे स्वरूप क्षणाक्षणाला बदलत असल्याने पर्यटकांनी केवळ उत्साहाच्या भरात खोल पाण्यात जाणे टाळावे, तसेच जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवरक्षकांची नजर चुकवून समुद्रात उतरू नका; काही क्षणांचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.

