(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी देखभाल केल्याच्या आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याच्या घोषणा करणाऱ्या महावितरणचा फोल कारभार हातखंबा तिठा परिसरात पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे. तब्बल १४ ते १५ तास सलग वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना अक्षरशः अंधारात रात्र काढावी लागली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पाहण्याची तसदीही संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचा संताप सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
आजच्या युगात वीज ही चैनीची गोष्ट नसून जीवनावश्यक सेवा आहे. घरगुती उपकरणांपासून दवाखाने, पाणीपुरवठा, इंटरनेट, बँकिंग, उद्योग आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत सर्वच व्यवस्था विजेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत १५ तास नागरिकांना अंधारात ठेवणे म्हणजे सेवा नव्हे, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस म्हणावा लागेल. याहून गंभीर बाब म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. काही दिवसांपूर्वीही दीर्घकाळ वीजपुरवठा बंद राहिला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनाच नेमका कोणता भाग अंधारात आहे, याची माहिती नव्हती. ही बाब महावितरणच्या नियंत्रण यंत्रणेची लाज काढणारी होती. तरीही त्यातून कोणताही धडा घेतला गेला नाही. परिणामी नागरिकांना पुन्हा त्याच निष्काळजीपणाचा फटका पुन्हा बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
महावितरणकडून दरमहा वेळेवर वीजबिलाची अपेक्षा केली जाते. बिल उशिरा भरले तर दंड, वीजतोडणी आणि नोटिसा देण्यात क्षणाचाही विलंब होत नाही. मग सेवा देण्याची वेळ आली की हीच तत्परता नेमकी कुठे गायब होते? ग्राहकांनी जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि अधिकाऱ्यांनी मात्र निष्काळजीपणाचे संरक्षण करायचे, असा हा एकतर्फी कारभार किती दिवस चालणार? या परिसरात गेल्या १४ ते १५ तासांत कोणतेही मोठे वादळ आले नाही, झाडे कोसळल्याची घटना घडली नाही, अगदी जोरदार वाऱ्याचाही सामना परिसराला करावा लागला नाही. अशा परिस्थितीत एवढ्या प्रदीर्घ काळासाठी वीजपुरवठा खंडित होणे अधिकच गंभीर ठरते. नैसर्गिक आपत्ती नसताना तब्बल १५ तास नागरिकांना अंधारात ठेवण्यामागे नेमके कारण काय, हा प्रश्न आता थेट सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
प्रश्न फक्त वीज गेल्याचा नाही, तर महावितरणच्या उत्तरदायित्वाचाही आहे. जर १४ ते १५ तास सलग वीजपुरवठा सुरळीत करता येत नसेल, तर पावसाळ्याची सज्जता नेमकी गेली कुठे? देखभाल कामांचा गाजावाजा कशासाठी? हातखंबा तिठा परिसरात एवढा मोठा बिघाड होऊनही त्याचे कारण, दुरुस्तीचा कालावधी आणि पर्यायी व्यवस्था याबाबत नागरिकांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. संवादाचा अभाव आणि जबाबदारीपासून पळ काढण्याची प्रवृत्ती हीच महावितरणच्या स्थानिक कारभाराची ओळख बनत चालली आहे.
जर हा बिघाड तांत्रिक असेल, तर तो दूर करण्यासाठी इतका वेळ का लागला? आणि जर यंत्रणाच सक्षम नसेल, तर पावसाळ्यापूर्वी केलेल्या देखभाल कामांचा आणि “सज्जतेच्या” दाव्यांचा नेमका उपयोग काय? नैसर्गिक संकट नसतानाही वीजपुरवठा सुरळीत ठेवता येत नसेल, तर प्रत्यक्ष मोठ्या आपत्तीच्या वेळी महावितरणची यंत्रणा किती सक्षमपणे काम करेल, याबाबतही नागरिकांच्या मनात गंभीर शंका निर्माण होत आहेत.

