(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी परिसरात आज (गुरुवारी) सायंकाळी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात भरत दौलत दळवी यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाने भीषण पेट घेतला. या थरारक घटनेवेळी झाडाखाली काम करत असलेल्या सौ. भावना भरत दळवी यांचा प्रसंगावधानामुळे थोडक्यात जीव वाचला.
आज दिवसभर बुरंबी परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काळे ढग दाटून आले. विजांचा लखलखाट आणि ढगांचा भीषण गडगडाट सुरू असतानाच अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि विजेचा प्रचंड लोळ थेट भरत दळवी यांच्या नारळाच्या झाडावर कोसळला.
क्षणभराच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी सौ. भावना दळवी या झाडाखाली पालापाचोळा आणि केरकचरा गोळा करत होत्या. वीज पडण्यापूर्वी झालेल्या प्रचंड आवाजामुळे त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत तेथून बाजूला धाव घेतली. अवघ्या काही क्षणांतच त्याच झाडावर वीज आदळली आणि झाडाने पेट घेतला.
“काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,” अशीच भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे. केवळ काही सेकंदांचा फरक पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असे दळवी कुटुंबीयांनी सांगितले. भावना दळवी यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्या सुखरूप बचावल्या, अशी माहिती त्यांचे दीर सुनील दळवी यांनी दिली.
पावसामुळे आगीवर नियंत्रण
वीज कोसळल्यानंतर वाऱ्याच्या जोरामुळे नारळाच्या झाडाने अक्षरशः रौद्र रूप धारण केले होते. झाडातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उंचवर जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही वेळातच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने झाडावरील आग आटोक्यात आली. या घटनेत नारळाच्या झाडाचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे दळवी कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

