(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संगणक, स्क्रीन आणि की-बोर्डमध्ये त्रुटी असल्याने परीक्षेवर परिणाम झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षेतील प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचा दावा करत कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पेपर फुटल्याचा आरोप केला आहे. राज्यातील सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी टायपिंग परीक्षा दिली. मात्र परीक्षा सुरू असताना अनेक केंद्रांवर तांत्रिक समस्या आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
संगणक आणि की-बोर्डमध्ये त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकांची गुणवत्ता समाधानकारक नव्हती. काही ठिकाणी स्क्रीनचा आकार वेगवेगळा होता, स्क्रीनचे रंग बदलत होते, तर की-बोर्डवर एक अक्षर टाइप केल्यानंतर दुसरेच अक्षर स्क्रीनवर उमटत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या तांत्रिक अडचणींमुळे २० गुणांच्या टायपिंग परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी अनेक विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी केली.
दुपारी एकपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर परीक्षा केंद्रप्रमुख आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी परीक्षा उच्च न्यायालयाशी संबंधित असल्याने केंद्र व्यवस्थापनाला परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा
अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षेतील प्रश्नपत्रिका लिखित स्वरूपात उपलब्ध झाल्याचा दावा केला. या आधारे त्यांनी पेपर फुटल्याचा आरोप केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात फुटली होती की नाही, याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा पुष्टी झालेली नसल्याने हा सध्या आरोप आणि विद्यार्थ्यांच्या दाव्यांपुरताच विषय आहे.
“सर्व आश्वासने लिखित स्वरूपात द्या”
परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाशी चर्चा करताना, विद्यार्थ्यांचे म्हणणे संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर मिळणाऱ्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला. यावर दिपके यांनी “विद्यार्थ्यांना दिली जाणारी सर्व आश्वासने आणि पुढील कार्यवाहीबाबतची माहिती लिखित स्वरूपात द्यावी,” अशी मागणी केली. उद्या परीक्षेबाबत जाब विचारण्याची वेळ आल्यास नेमकी जबाबदारी कोणाची असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना या परीक्षेत न्याय मिळावा, तांत्रिक अडचणींची चौकशी करावी आणि पेपर फुटल्याच्या आरोपाचीही तपासणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान नांदेडसह राज्यातील काही परीक्षा केंद्रांवरही तांत्रिक अडचणी आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सदोष व जाम झालेले कीबोर्ड, स्लो वेबसाईट, झूम-इन-झूम-आउटच्या समस्या आणि सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे परीक्षा पूर्ण करता आली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही केंद्रांवर तांत्रिक समस्यांमुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असून, तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत ७६ परीक्षार्थींनी लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालय आणि खंडपीठातील लिपिक पदासाठी राज्यभरात सुमारे १३ हजार उमेदवार टायपिंग टेस्टसाठी पात्र झाले आहेत. तांत्रिक अडचणींचा थेट परिणाम निकालावर झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी निष्पक्षपणे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. परीक्षा यंत्रणा या तक्रारींची दखल घेऊन पुढील निर्णय काय घेते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
परीक्षा पुन्हा होणार का?
तांत्रिक अडचणी आणि पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे उच्च न्यायालय लिपीक पदाची टायपिंग परीक्षा पुन्हा घेतली जाणार का, याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे. परीक्षेतील तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि पेपर फुटल्याच्या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच पुढील निर्णय स्पष्ट होणार आहे.

