( नवी दिल्ली )
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भारत टॅक्सी चालकांशी थेट संवाद साधत सहकारी क्षेत्राला बळ देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट केली. सहकारी क्षेत्र हे सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत त्यांनी चालकांना या नव्या मॉडेलचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले.
5 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये देशातील पहिली सहकारी-आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी लाँच करण्यात आली. हा प्रकल्प खासगी कंपन्यांच्या धर्तीवर नसून थेट चालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आला आहे.
सहकार म्हणजे एकत्र काम, एकत्र नफा
संवादादरम्यान अमित शाह म्हणाले, “सहकाराचं तत्त्वज्ञान नीट समजून घेतलं तर प्रश्न निर्माण होत नाहीत. सहकार म्हणजे एकत्र काम करणं आणि एकत्र नफा मिळवणं.” यासाठी त्यांनी Amul चं उदाहरण दिलं. गुजरातमधील 36 लाख माता-भगिनी अमूलच्या सदस्य असून, सुरुवातीला केवळ 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून ही संस्था उभी राहिली. आज या सहकारी प्रकल्पाची वार्षिक उलाढाल सुमारे 1.25 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असं त्यांनी सांगितलं.
‘तुम्हीच आहात मालक’
भारत टॅक्सीबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, “खासगी कंपन्या मालकाला श्रीमंत करतात. इथे फरक इतकाच आहे की मालक दुसरं कोणी नसून तुम्ही स्वतः आहात.” केवळ 500 रुपयांची गुंतवणूक करून चालक भारत टॅक्सीचा भागीदार होऊ शकतो. भविष्यात नफा झाल्यास त्यातील 20 टक्के रक्कम संस्थेच्या भांडवलात जमा होईल, तर उर्वरित 80 टक्के वाटप चालकांनी केलेल्या किलोमीटरनुसार होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे चालकांना निश्चित भाड्याबरोबरच नफ्यातील वाटाही मिळेल. मात्र पहिली तीन वर्षे संयम ठेवावा लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
खाजगी कंपनी नाही, लोकांच्या सक्षमीकरणाचा उपक्रम
“भारत टॅक्सीचा उद्देश नफा कमावणारी खाजगी कंपनी बनणं नाही, तर लोकांना सक्षम करणं आहे,” असं अमित शाह म्हणाले. सर्व व्यवहार पारदर्शक असतील, कोणतीही माहिती लपवली जाणार नाही आणि चालकांचं शोषण कधीच होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाच मोठ्या सहकारी संस्थांपासून सुरुवात
भारत टॅक्सीची सुरुवात देशातील पाच मोठ्या सहकारी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. भविष्यात चालकांची संख्या वाढल्यावर, 500 रुपयांचा वाटा भरून कोणताही चालक मालक बनू शकेल. संचालक मंडळातही चालक प्रतिनिधी असतील, जे त्यांच्या हिताचे रक्षण करतील, असं अमित शाह यांनी सांगितलं.
भाडे दरांबाबत स्पष्ट भूमिका
केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, भारत टॅक्सी कधीही मूळ दरापेक्षा कमी भाडे आकारणार नाही. किमान भाड्यावर नफा जोडला जाईल आणि सर्व दरांची माहिती आधीच अधिसूचनेद्वारे दिली जाईल.
भारत टॅक्सीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रात नवा प्रयोग सुरू झाला असून, खासगी अॅप्सच्या पर्याय म्हणून चालक-केंद्रित मॉडेल पुढे येत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

