(नागपूर / वृत्तसंस्था)
नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शासकीय निवासस्थानी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ज्ञानेश्वर झोल हे पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय क्वार्टरमध्ये राहत होते. रात्री कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्राथमिक तपासात घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
झोल यांच्यावर कामाचा ताण होता का, वैयक्तिक कारणांमुळे ते तणावात होते का किंवा यामागे अन्य काही कारण आहे का, या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. कोणतेही ठोस कारण अधिकृतपणे समोर आलेले नसताना त्याबाबत अंदाज व्यक्त करणे टाळणे महत्त्वाचे आहे.
पत्नी आणि जुळ्या मुलांवर दुःखाचा डोंगर
ज्ञानेश्वर झोल यांच्या पश्चात पत्नी आणि साडेतीन वर्षांची जुळी मुले, एक मुलगा आणि एक मुलगी, असा परिवार आहे. मनमिळावू, हसतमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची सहकाऱ्यांमध्ये ओळख होती. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जालना जिल्ह्यातील मूळ गावी नेण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्ञानेश्वर झोल यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास गिट्टीखदान पोलीस करत असून, पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

