(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक आणि पक्षभेदापलीकडे जाऊन विकासकामे करण्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा पवार गट) जाहीर प्रवेश केला.
या वेळी साईप्रसाद लिंगायत, संतोष सनगरे, जयवंत सनगरे, महादेव शिरगावकर, संदेश सनगरे, सचिन सनगरे, राजाराम भोजने, आकाश भेकरे, पराग गुरव, अनिल गेल्ये, बाबू गेल्ये आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षभेद न करता विकासकामांना प्राधान्य
आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देताना पक्षभेद न करता रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबविल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. माझ्या राजकारणाचा पाया मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास हा आहे. गावाचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे. तो सोडवताना संबंधित व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, हे मी कधीही पाहिले नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि प्रामाणिक ग्रामस्थांना सोबत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे,” असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. त्यांच्या या विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
शिवणे गावातील संघटन मजबूत होणार
शिवणे येथील ग्रामस्थांच्या पक्षप्रवेशामुळे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, आगामी काळात विकासाभिमुख राजकारणाला आणखी वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, उपसभापती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्या आरुषी घवाळी, युवक अध्यक्ष प्रतीक साळवी, नितीन भोसले, कोसूंब ग्रामपंचायत सदस्य अमित जाधव, आबा जाधव, स्नेहल गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष रेहान गडकरी, ओंकार गायकवाड, प्रज्ज्वल जाधव, मारुफ साटविलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवणे येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

