(राजापूर / तुषार पाचलकर)
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट सेवा तसेच अतिउत्कृष्ट सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांना पोलिस महासंचालकांकडून उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्रदिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक अमित यादव यांना उत्कृष्ट सेवापदक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, गुन्हेगारीविरोधात केलेल्या प्रभावी कारवाया तसेच नागरिकांशी संवेदनशीलतेने आणि माणुसकीच्या भावनेने संवाद साधण्याची भूमिका यामुळे त्यांच्या उल्लेखनीय पोलिस सेवेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते अमित यादव यांना सेवा पदक प्रदान करून पुष्पगुच्छ देत त्यांच्या उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल कौतुक करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करताना दाखविलेल्या कार्यतत्परतेची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाल्याचे सांगत पालकमंत्री सामंत यांनी त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. अमित यादव यांना मिळालेल्या या सन्मानामुळे राजापूर पोलिस ठाण्याचा तसेच संपूर्ण राजापूर पोलिस दलाचा गौरव वाढला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
अमित यादव यांनी राजापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलिस दलात तसेच नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्यानंतर राजापूर शहर आणि परिसरातून पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे राजापूर पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

