(राजापूर / तुषार पाचलकर)
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असतानाही राजापूर तालुक्यातील पाचल गावात स्वातंत्र्यदिनाची एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे. पाचल येथील ऐतिहासिक आझाद टेकडीवर दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणापासून सुरू झालेली ही परंपरा आज आठ दशकांनंतरही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
१५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वसंध्येला, म्हणजेच १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता, राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी पाचल येथील या टेकडीवर तिरंगा फडकावून भारताच्या स्वातंत्र्याला अभिवादन केले होते. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती आजही पाचलवासीयांनी जपल्या आहेत. याच ऐतिहासिक घटनेमुळे या ठिकाणाला पुढे ‘आझाद टेकडी’ म्हणून ओळख मिळाली.
त्या काळात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गो. बा. तथा आबा नारकर, पु. ल. तथा आण्णा वायकुळ, आण्णा लब्दे, आण्णा रेडीज, बाबा मलूष्ठे, नामदेव भिंगार्डे, केशव नारकर तसेच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ऐतिहासिक क्षणी त्यांनी आझाद टेकडीवर तिरंगा फडकावून नवभारताच्या स्वातंत्र्याचे स्वागत केले. त्यांच्या त्यागाची आणि देशभक्तीची आठवण आजही या परंपरेतून जिवंत ठेवली जात आहे.
पाचल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचा सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात पाचल ग्रामपंचायत इमारतीजवळील दीक्षाभूमी येथे ध्वजारोहणाने होते. त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अन्य शाळांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात.
यानंतर विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून मुख्य रस्ता व बाजारपेठेतून प्रभातफेरी काढण्यात येते. ही प्रभातफेरी ऐतिहासिक आझाद टेकडीवर पोहोचते. तेथे सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडतो.
आझाद टेकडीवर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले जाते. त्यानंतर पाचल गावचे प्रथम नागरिक यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण केले जाते. या कार्यक्रमात पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी, खासगी शाळा, अंगणवाड्या, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.
आझाद टेकडीवरील हा तिरंगा केवळ राष्ट्रध्वज नसून पाचलच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि देशप्रेमाची अखंड परंपरा यांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या पहाटेपासून सुरू झालेली ही परंपरा आजच्या पिढीलाही स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आणि देशप्रेमाची प्रेरणा देत आहे.
८० वर्षांनंतरही आझाद टेकडीवर अभिमानाने फडकणारा तिरंगा पाचलवासीयांसाठी विशेष भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा ठरला आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पेटवलेली देशभक्तीची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या परंपरेतून सातत्याने केले जात आहे.

