(रत्नागिरी /प्रतिनिधी)
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे ग्रामपंचायतीने एका प्रेरणादायी उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला सन्मान देत अनोखा आदर्श निर्माण केला. सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारणारी गावची सुकन्या कु. युती निलेश तोडणकर हिच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना तोणदे ग्रामपंचायतीने गावातील गुणवंत खेळाडूचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत युतीने सहभाग नोंदवत आपल्या धावण्याच्या कौशल्याची छाप उमटवली होती. राज्यस्तरीय व्यासपीठावर गावाचे प्रतिनिधित्व करत तिने तोणदेचा बहुमान वाढविला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ग्रामपंचायतीने तिला ध्वजारोहणाचा मान देऊन तिच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
गावातील एका लहान वयाच्या खेळाडूला स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात ध्वजारोहणाचा सन्मान देणे हा केवळ पुरस्कार नसून, गावातील नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा संदेश असल्याचे मानले जात आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुला-मुलींना संधी आणि प्रोत्साहन मिळाले, तर त्यांच्यातील गुणवत्ता राज्य व राष्ट्रीय पातळीवर झळकू शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. या वेळी सरपंच शीला जाधव, उपसरपंच वैभव चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युतीच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना ग्रामस्थांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावच्या सुकन्येच्या क्रीडा कर्तृत्वाला राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात मानाचे स्थान देत तोणदे ग्रामपंचायतीने ‘गुणवत्तेला सन्मान आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन’ या विचाराचा आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांसह परिसरातून कौतुक होत आहे.

