(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची आणि सर्वसामान्य प्रवाशांची ‘जीवनवाहिनी’ असलेली दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला मध्य रेल्वेने साफ केराची टोपली दाखवली आहे. दिवा-दादर विभागातील रेल्वेमार्गाची क्षमता आणि दादर टर्मिनसच्या मर्यादांचे जुनेच तांत्रिक तुणतुणे वाजवत ही सेवा पूर्ववत करणे किंवा दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा विस्तार करणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने दिली आहे. नितीन जाधव यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या (RTI) अर्जातून रेल्वेचा हा कोकणविरोधी आणि दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला असून, प्रवाशांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.
१९९६-९७ मध्ये रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान सुरू झालेली आणि पुढे प्रवाशांच्या आग्रहाखातर गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून मार्च २०२० पर्यंत धावणारी ही गाडी कोकणकरांचा मोठा आधार होती. मात्र, करोनाकाळाचे निमित्त साधून बंद केलेली ही गाडी नंतर दादरऐवजी दिवा स्थानकातून सोडण्याचा तुघलकी निर्णय रेल्वेने घेतला. लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणाचे कारण पुढे करून हा बदल केला गेला; परंतु दिवा स्थानकातून गाडी सोडूनही वेळापत्रकाचा बोजवारा कायम राहिला. आता तर दादर स्थानकातील मर्यादित सुविधा आणि दिवा-दादर मार्गाच्या क्षमतेचे कारण देत ही जुनी हक्काची सेवा कायमची गुंडाळण्याचा घाट रेल्वेने घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेच्या या तांत्रिक कारणांवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि सर्वसामान्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. दिवा-दादर मार्गावर क्षमता उपलब्ध नसल्याचे कारण देत कोकणची दादर-रत्नागिरी पॅसेंजर नाकारली जाते; मग याच मार्गावरून आणि याच दादर स्थानकातून ‘दादर-गोरखपूर’ विशेष गाडी कायमस्वरूपी चालवण्याची परवानगी रेल्वे मंडळाने नेमक्या कोणत्या जादूच्या कांडीने दिली, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारत आहेत. प्रवाशांची समजूत काढण्यासाठी ८ सप्टेंबर २०२६ पासून १५०८७/१५०८८ सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस सुरू करून तिला दादरला थांबा दिला असला, तरी ही गाडी सर्वसामान्य चाकरमान्यांची दादर-रत्नागिरी पॅसेंजरची उणीव कधीही भरून काढू शकत नाही.
याच माहिती अधिकार अर्जात मुंबई-मडगावदरम्यान धावणाऱ्या २२२२९/२२२३० वंदे भारत एक्स्प्रेसला २० डब्यांचा संच कायमस्वरूपी देणे आणि फेऱ्या वाढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावरही ‘प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे’ असे ठराविक सरकारी उत्तर देऊन रेल्वेने वेळ मारून नेली आहे. एकीकडे वंदे भारतसारख्या प्रीमियम गाडीचा विस्तार रखडला आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांची पॅसेंजर गाडी हिरावून घेतली जात आहे. एकंदरीत, कोकणच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि मध्य रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे कोकणवासीयांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता केवळ आठवणीतच राहणार की काय, अशी संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
“आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही मुंबई ते गाव हा प्रवास केवळ ‘दादर पॅसेंजर’ या आमच्या हक्काच्या गाडीनेच केला. मुंबईला परततानाही आम्ही पती-पत्नी रात्रीच रेल्वे स्थानकावर मुक्काम करायचो; कारण पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास ही गाडी अगदी वेळेवर प्लॅटफॉर्मला उभी असायची. त्यामुळे आम्हाला निवांत बसून आरामदायी प्रवास करता येत असे. आज वयाची सत्तरी ओलांडली तरी त्या गाडीच्या आठवणी मनात घर करून आहेत. मात्र, सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने आमचा हा हक्काचा आधार कायमचा बंद करून टाकला आहे. आता इतर एक्स्प्रेस गाड्यांना इतकी अफाट गर्दी असते की डब्यात पाऊल ठेवायलाही जागा नसते, तिथे बसायला मिळण्याची आशा तर दूरच! अशा जीवघेण्या गर्दीत आणि रेटारेटीत आम्ही वयोवृद्ध माणसांनी प्रवास करायचा तरी कसा? प्रशासनाने आमचा हा हक्क का हिरावला?”
– विजया कांबळे, (वयोवृद्ध प्रवासी, दादर पॅसेंजरच्या पूर्वीच्या नियमित प्रवासी)


