(खेड /रत्नागिरी)
खेड तालुक्यातील लवेल येथील लीना पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनसमोरील मोकळ्या आवारात ठेवलेली सुमारे ९० हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम कंडक्टर वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ३ हजार ८०० मीटर लांबीची ही वायर चोरीला गेल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या गोडाऊनसमोरील मोकळ्या जागेत लाकडी ड्रममध्ये ३ हजार ८०० मीटर लांबीची ॲल्युमिनियमची पिळ मारलेली कंडक्टर वायर ठेवण्यात आली होती. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही वायर फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली. चोरीला गेलेली वायर दोन वर्षे जुनी असून तिची अंदाजे किंमत ९० हजार रुपये आहे.
या प्रकरणी अखिलेशकुमार श्रीलालताप्रसाद प्रजापती (वय ४८) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


