(रत्नागिरी / प्रतिनिधी)
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ. कांचन शिरीष मदार यांना सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले, तरी या निवडीवरून वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र भुवया उंचावल्या आहेत. ज्यांच्यावर लाच घेतल्याचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीला थेट राज्यस्तरीय पातळीवर गौरविण्यात आल्याने आयएमएच्या पुरस्कार निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागपूर येथे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित आयएमए महाराष्ट्र राज्याच्या ‘मॅस्टाकॉन २०२६’ (MASTACON 2026) या वार्षिक परिषदेत हा सोहळा पार पडला. राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते, तर माजी अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी यांच्या उपस्थितीत डॉ. मदार यांना सन २०२५-२०२६ या वर्षासाठीचा ‘प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड – बेस्ट चेअरमन, वुमेन डॉक्टर्स विंग’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील लाखो डॉक्टरांमधून कोकण विभागातील एकमेव महिला डॉक्टर म्हणून त्यांची निवड झाल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी त्यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी पाहता हा गौरव कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
डॉ. कांचन मदार या उच्चशिक्षित स्त्रीरोगतज्ज्ञ व मेडिकोलिगल सल्लागार असून, गेल्या वीस वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांना ‘बेस्ट आयएमए डॉक्टर’, ‘सेवाभावी डॉक्टर’ आणि ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, एकीकडे लाचखोरीसारख्या गंभीर आरोपांचे सावट असताना आणि दुसरीकडे संघटनेकडून सलग चार वेळा राज्यस्तरीय पुरस्कारांची खैरात होत असल्याने, पुरस्कारांचे निकष नेमके काय आहेत, असा खोचक प्रश्न विचारला जात आहे.
उपक्रमांच्या आकड्यांमागे आरोपांवर पांघरूण?
डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘वुमेन डॉक्टर्स विंग’च्या अध्यक्षा म्हणून डॉ. मदार यांनी राज्यभरात २८४ उपक्रम राबवल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली राबवलेल्या या उपक्रमांचे आकडे दाखवून या पुरस्काराचे समर्थन केले जात असले, तरी वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेचे काय, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे सांगितले जात असले, तरी वादाच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीच्या सन्मानामुळे उलट आयएमएच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसल्याची चर्चा सध्या रंगली आहे.


