(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या हापूस आंबा हंगामाला यंदा मोठा फटका बसला असून बागांमध्ये केवळ सुमारे २० टक्केच आंबा शिल्लक राहिल्याचे चित्र समोर आले आहे. उत्पादनातील या घसरणीचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसून येत असून वाशी बाजारात एरव्ही येणारी सुमारे सहा हजार पेट्यांची आवक यंदा अवघ्या एक हजार पेट्यांवर घसरली आहे. त्यातही रत्नागिरीचा वाटा केवळ ४०० ते ५०० पेट्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे.
उत्पादनात झालेल्या घटेमुळे निर्यातीवरही मोठा परिणाम झाला असून आखाती देशांमध्ये जाणाऱ्या हापूसच्या निर्यातीमध्ये तब्बल ७० टक्क्यांची घट झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. परिणामी परदेशी बाजारपेठेत कोकणच्या हापूसची गोडी यंदा काहीशी कमी झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. रत्नागिरी येथे आंबा बागायतदार संघटनेची विचारमंथन बैठक पार पडल्यानंतर जयेश मंगल पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे पदाधिकारी डॉ. विवेक भिडे आणि प्रकाश साळवी यांनी बागायतदारांची व्यथा मांडली.
आंबा पिकासाठी घेतलेले कर्ज सुमारे ६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, पीकच हातात नसल्याने हे कर्ज फेडणे आता बागायतदारांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंबा विक्री, दर आणि विपणन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी दलाल आणि शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांत आयोजित केली जाणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली.
पीक विमा योजनेतील पाच एकरची मर्यादा अन्यायकारक असल्याचा आरोप करत बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली. बागायतदारांना विश्वासात न घेता विम्याचे निकष ठरवले जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. विमा दाव्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक गावात ‘पर्जन्यमापक’ यंत्र बसवण्याची मागणी बागायतदारांनी केली आहे.
उत्पादन घटल्यामुळे बाजारात आंब्याच्या पेटीचा दर सहा हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा बागायतदारांना होत नसल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. मोठे बागायतदार या व्यवसायापासून दूर का जात आहेत, याचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले. अन्यथा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा आंबा व्यवसाय गंभीर संकटात सापडेल, असा इशाराही बागायतदारांनी दिला.

