( रत्नागिरी /प्रतिनिधी )
सोने व्यापार्याच्या अपहरण-लूट प्रकरणातील मुख्य संशयित सागर कदम याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गुरुवारी त्याने देवरूख पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तब्बल नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवरूखलगत साडवली, सह्याद्रीनगर येथे राहणारे सुवर्णकार धनंजय केतकर यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या प्रकरणात काही आरोपींना आधीच अटक झाली असली तरी, तपासात सागर कदम (रा. हातखंबा) हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी पोलिसांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू ठेवला होता.
दरम्यान, कदमने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, बुधवारी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर गुरुवारी त्याने देवरूख पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अटक केल्यानंतर देवरूख न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून वेगाने करण्यात येत असून पुढील काही दिवसांत तपासात महत्त्वपूर्ण उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

