(रत्नागिरी /प्रतिनिधी)
‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरीत बँकर्ससह विविध केंद्र सरकारी कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत देशभक्तीचा जागर केला. नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीत १७५ हून अधिक कर्मचारी सहभागी झाले. देशप्रेमाच्या घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला.
नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या अंतर्गत शिवाजीनगर येथून रॅलीला सुरुवात झाली. तेथून जयस्तंभ आणि पुन्हा शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. बँक ऑफ इंडियाच्या आंचलिक कार्यालयासह रत्नागिरी जिल्हा बँकर्सच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जनजागृती करत नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. नगर राजभाषा कार्यान्वयन समितीमध्ये केंद्र सरकारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या तसेच अन्य मिळून सुमारे ३० कार्यालयांचा सहभाग आहे. अग्रणी बँकेच्या समन्वयातून आरडीसीसी तसेच अन्य बँक कार्यालयांनीही या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या रॅलीत सर्व बँकर्ससह भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, भारतीय तटरक्षक कार्यालय, आयकर विभाग, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, दीपस्तंभ व डीजीपीएस कार्यालय, विविध विमा कंपन्या, डाक कार्यालय तसेच अन्य केंद्र सरकारी कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आणि सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आणि बँकर्सच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
या रॅलीला बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे आणि उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आझाद यांनी उपस्थित राहून मोहिमेला प्रोत्साहन दिले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, समितीचे सदस्य सचिव रमेश गायकवाड तसेच बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले. देशभक्तीचा संदेश आणि सामाजिक बांधिलकीची भावना घेऊन निघालेल्या या रॅलीमुळे रत्नागिरी शहरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला.

