(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी प्रकल्पाविरोधात गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या स्थानिक शेतकरी किशोर परशुराम सुर्वे यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने आणि कंपनीच्या प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे रविवारी सायंकाळी हे आंदोलन यशस्वीपणे संपुष्टात आले.
७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेले हे उपोषण रविवारी सहाव्या दिवशी निर्णायक टप्प्यावर पोहोचले होते. सुर्वे यांच्या मागण्यांबाबत जेएसडब्ल्यू एनर्जीचे अधिकारी नरेश विलणकर, तसेच जयगडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद प्रभाकर घाटगे आणि माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या उपस्थितीत रचनात्मक चर्चा झाली. या चर्चेत जेएसडब्ल्यू एनर्जी प्रशासनाने सुर्वे यांच्या मागण्यांना मान्यता देत, उर्वरित प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
या पार्श्वभूमीवर सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास अनिरुद्ध साळवी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन किशोर सुर्वे यांनी आपले आमरण उपोषण संपवले. यावेळी उपस्थितांनी समाधानाचा निश्वास सोडला. उपोषण स्थळी यावेळी शिवसेना शाखाप्रमुख नारायणशेठ काताळकर, सामाजिक कार्यकर्ते विकास निंबाळकर, समीर मयेकर, प्रशांत सुर्वे, सौ. कामिनी सुर्वे, शैलेश मयेकर, सुदेश खाडे, तसेच पोलीस पाटील प्रसाद गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चेत जयगड पोलिस ठाण्याचे अधिकारी संजय पाटील यांनी घेतलेल्या सक्रिय पुढाकाराचेही सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
दरम्यान, या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही बाह्य शक्तींनी परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा होती; मात्र सुर्वे यांनी संयम आणि सामंजस्याची भूमिका घेत संवादाच्या माध्यमातून समाधानाचा मार्ग निवडला. त्यामुळे संघर्षाऐवजी संवादातून तोडगा निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

