(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी)
मध्यरात्री अचानक प्रकृती गंभीर झालेल्या नेपाळी महिलेच्या मदतीसाठी मंडणगड पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने तिच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना नागरिकाने केलेला ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनवरील कॉल महिलेच्या मदतीला अक्षरशः धावून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला माणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांच्या अतिदक्षता विभागातील उपचारांनंतर महिलेची प्रकृती सुधारली असून ती सुखरूप मंडणगडला परतली आहे.
मंडणगड शहरातील सीएनजी पेट्रोल पंपाजवळील क्लासिक फार्म हाऊस येथे गेल्या काही वर्षांपासून एक नेपाळी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील एका महिलेला रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आकडी आल्यासारख्या वेदना सुरू झाल्या. काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी चादरीच्या सहाय्याने चार जणांच्या मदतीने तिला रस्त्यापर्यंत आणले. मात्र, मध्यरात्रीची वेळ असल्याने रिक्षासाठी प्रयत्न करूनही मदत मिळाली नाही. रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. महिलेची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिक राजेश पारेख यांनी कोणताही विलंब न करता ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधला.
कॉल मिळताच मंडणगड पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. बक्कल क्रमांक १२३७ असलेले पोलीस कर्मचारी पहुरकर, पारधी, पीएसआय शीत, पोलीस हवालदार सुकाळे आणि चालक रामसिंग पवार यांनी महिलेची परिस्थिती पाहून तातडीने आवश्यक मदत केली. महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने तिला पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. माणगाव येथील रुग्णालयात महिलेची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तिची प्रकृती सुधारली. अखेर ती आपल्या कुटुंबीयांसह मंडणगड येथे सुखरूप परतली आहे.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरिक राजेश पारेख यांनी आभार व्यक्त केले. तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि उपचारासाठी मदत करणाऱ्या संबंधित यंत्रणांचेही त्यांनी कौतुक केले. आपत्कालीन परिस्थितीत ‘११२’ हा क्रमांक केवळ हेल्पलाइन न राहता संकटाच्या क्षणी मदतीचा विश्वासाचा आधार ठरू शकतो, याचा प्रत्यय या घटनेतून आला. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसताना पोलिसांनी वेळ न दवडता केलेल्या मदतीमुळे महिलेवर वेळीच उपचार होऊ शकले. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेचे मंडणगड परिसरातून कौतुक होत आहे.

