(रत्नागिरी / वार्ताहर)
दीप अमावस्येचे औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी विभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग येथे दीपोत्सव २०२६ उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादरवाजा आणि हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या उपक्रमात १४ मावळे व रणरागिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत झालेल्या दीपोत्सवात महादरवाजा आणि हनुमान मंदिर परिसरात आकर्षक दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते दीपपूजन करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांचे जतन आणि संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गडकिल्ले हे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, मावळ्यांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि पराक्रमाचा जिवंत वारसा आहेत. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर दीप प्रज्वलित करण्यात आले.
दीपांच्या प्रकाशाने महादरवाजा आणि हनुमान मंदिर परिसर उजळून निघाला. या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान निर्माण करण्यासोबतच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची जाणीव आणि त्यांचे जतन करण्याची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाच्या या उपक्रमाला मावळे व रणरागिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आपला गड, आपला इतिहास, आपली जबाबदारी’ या भावनेतून साजरा झालेला हा दीपोत्सव ऐतिहासिक वारसा जपण्याचा आणि भावी पिढ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचविण्याचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

