(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असला, तरी गैरहजेरीचे प्रमाणही लक्ष वेधून घेत आहे. चालक व शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी ८०८ उमेदवारांना हजेरीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ५०७ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ५१० उमेदवारच हजर राहिले. तब्बल २९८ उमेदवार गैरहजर राहिल्याचे समोर आले.
हजर उमेदवारांपैकी २३ जण नियमावलीत न बसल्याने अपात्र ठरविण्यात आले. परिणामी पात्र ठरलेल्या ४८७ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे आणि गोळाफेक अशा कसोटीपूर्ण चाचण्या पार पडल्या. शिपाई आणि चालक अशा एकूण १०८ पदांसाठी गेल्या आठवड्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू असून, पहाटे साडेपाच वाजल्यापासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रीडा संकुलात उमेदवारांची लगबग पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध वातावरणात आणि कडक निकषांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दरम्यान, भरतीच्या चौथ्या दिवशी केवळ महिलांसाठी प्रक्रिया पार पडली. १,०२७ महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ७८९ महिला उपस्थित राहिल्या, तर २३८ महिला गैरहजर राहिल्या. उपस्थित उमेदवारांपैकी १०१ जणी अपात्र ठरल्या. परिणामी पात्र ठरलेल्या ६८८ महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली. भरती प्रक्रियेत उमेदवारांचा उत्साह जाणवत असला, तरी गैरहजेरी आणि अपात्रतेचे प्रमाण प्रशासनासमोर चिंतेचा विषय ठरत आहे. आगामी दिवसांत उर्वरित टप्पे पार पडणार असून, पात्र उमेदवारांसाठी ही संधी निर्णायक ठरणार आहे.

