( मुंबई )
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना’ साजरा केला जाणार आहे. या कालावधीत नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत.
या अभियानात परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार असून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या मार्गदर्शनाखाली या महिन्यात
- प्रशिक्षण कार्यक्रम
- कार्यशाळा व परिसंवाद
- वाहनचालकांसाठी जनजागृती सत्रे
- शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा उपक्रम
- नेत्र तपासणी शिबिरे
- प्रचारात्मक मोहिमा
असे विविध कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येणार आहेत.
यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना ‘सडक सुरक्षा – जीवन रक्षा’ अशी असून रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून ती थेट मानवी जीवनाच्या संरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
या अभियानामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन आयुक्त, मुंबई यांनी व्यक्त केला आहे.

