(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुखजवळील साडवली सह्याद्री नगर येथील सुवर्णकाराच्या अपहरण व खंडणी प्रकरणाचा तपास गतीमान करताना देवरुख पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा हस्तगत केला आहे. मास्टरमाईंड आरोपी सागर कदम याच्याकडील कसून चौकशीदरम्यान उघडकीस आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल शोधून काढली. शनिवारी दुपारी लांजा तालुक्यातील वाटुळजवळील मुचकुंदी नदीतून ही पिस्तूल जप्त करण्यात आली.
या संपूर्ण शोध मोहिमेचे नेतृत्व उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथक तत्परतेने कार्यरत होते. मास्टरमाईंड सागर कदमच्या माहीतीवर विश्वास ठेवून पोलिसांनी नदी परिसरात शोधमोहीम हाती घेतली. पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, सचिन पवार, सुहास लाड आदींच्या पथकास स्थानिक गोताखोर देऊ गजबार व संजय गजबार यांनी विशेष सहकार्य केले. नदीत उतरून या दोघांनी पिस्तूल शोधण्यात मोलाची भूमिका बजावली, अशी माहिती डीवायएसपी कदम यांनी पत्रकारांना दिली.
सह्याद्री नगर येथील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहरणासाठी वापरलेली रिव्हॉल्वर तपासाचा प्रमुख दुवा ठरत होती. या गुन्ह्यातील एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, सागर कदमच्या जामीन अर्जाला न्यायालयाने नकार दिल्यानंतर तो स्वयंस्फूर्तीने गुरुवारी पोलिसांपुढे हजर झाला. न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत त्याने पिस्तूल मुचकुंदी नदीत फेकल्याचे कबूल केले.
याप्रकरणी मास्टरमाईंड सागर कदम, प्रणित दुधाने आणि राजेश नवाले यांनी मिळून नांदेड येथे जाऊन पिस्तूल खरेदी केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांनी दिली. गुन्ह्यातील शस्त्र जप्त झाल्याने तपासाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

