(खेड / वार्ताहर)
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांच्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ९.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. बाजारपेठ मार्गे मार्गक्रमण करत रॅलीचा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह खेड तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक-युवती तसेच शहरातील देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. रॅली अत्यंत शिस्तबद्ध, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नागरिकांमध्ये रॅलीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या वेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. खेडमधील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दर्शवणारा आहे. तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी, असे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सांगितले.
राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही भव्य तिरंगा रॅली ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.

