(जैतापूर / वार्ताहर)
महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अडीच ते तीन तास प्रचंड उकाड्यात घामाच्या धारांत ग्रामस्थांना अंधारातच ग्रामसभा पार पाडावी लागली. सभास्थळी पुरेसा प्रकाश नसल्याने मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात ग्रामसभा सुरू ठेवण्यात आली. वीजपुरवठा नसतानाही ग्रामस्थांनी संयम राखत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दळे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामसभेचे सचिव म्हणून मुख्याध्यापक अरुण सुर्वे यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक गोरक्ष शेलार यांनी त्यांना सहकार्य केले. ग्रामसभेच्या सुरुवातीला शासनाकडून प्राप्त परिपत्रकांचे तसेच मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांवर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित करून चर्चा केली.
ग्रामसभेला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत माहिती घेण्यासाठी अनेक महिला उपस्थित होत्या. आतापर्यंत महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. बचत गटांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना आणि निधीबाबत ग्रामस्थांना स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
कांदळवन समितीची स्थापना होऊनही तिचा ठराव समितीच्या अध्यक्षांना मिळालेला नसल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. समिती स्थापन होऊनही कांदळवन प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ दळे गावाला अद्याप मिळू शकलेला नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी स्थापन झालेल्या समितीचा ठराव मुदत संपण्याच्या अवघ्या महिनाभर आधी मिळाल्याचा मुद्दा काझी यांनी उपस्थित केला. त्यामागील कारण समजू शकले नसल्याचे सांगत, यावेळी समिती स्थापन झाल्यानंतर ठराव तात्काळ अध्यक्षांकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अडीच ते तीन तास ग्रामस्थांना प्रचंड उकाड्यात घामाच्या धारांत बसावे लागले. सभास्थळी पुरेसा प्रकाश नसल्याने मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात ग्रामसभा घेण्यात आली. वीजपुरवठा नसतानाही ग्रामस्थांनी संयम राखत चर्चेत सहभाग घेतला.
ग्रामसभेसाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याबद्दलही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामसभा घेण्यासाठी मोठी आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दळे ग्रुप ग्रामपंचायतीची इमारत नेमकी कोणाच्या जागेत आहे, याबाबत सत्यवान जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भातील कागदपत्रे आणि वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्राम सुरक्षा दल तसेच दारूबंदीशी संबंधित समितीची स्थापना या ग्रामसभेत होऊ शकली नाही. दारूबंदीची जबाबदारी केवळ ग्रामस्थांवरच का सोपविली जाते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शासन आणि पोलिस यंत्रणा कार्यरत असतानाही गावात दारूविक्रीला आळा का बसत नाही, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांचा रोष शासनाच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामसभेचे निर्णय तसेच शासनाकडून प्राप्त होणारी माहिती ग्रामस्थांपर्यंत वेळेवर पोहोचावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात यावा, अशी सूचना प्रशासक तथा अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली. या सूचनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
यापूर्वीही अशा प्रकारचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने अनेक शासकीय योजना आणि ग्रामपंचायतीशी संबंधित माहिती ग्रामस्थांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे व्हॉट्सॲप ग्रुप तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
प्रशासक सुनील पाटील यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर संयमाने चर्चा करत अनेक विषयांची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे सुमारे अडीच ते तीन तास चाललेली ग्रामसभा शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या ग्रामसभेतील चर्चेत राजन लाड, महेश करगुटकर, जब्बार काझी, समीर शिरवडकर, विजय गोरिवले, प्रियांका गुरव, रेशम लाड, सत्यवान जाधव, संजय लासे, नैषदा गिरकर, स्नेहल गिरकर, डॉ. सिद्धेश पडवळ, प्रभाकर खानविलकर, सुनीता गुरव, दीक्षा साकरकर, वंदना जाधव, सांची साखरकर, सिद्धी शिरसेकर, गणेश बाणे, पिंट्या शिरवडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

