(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्यात सामाजिक आणि वैयक्तिक सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबविलेले ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हे अभियान विशेष ठरले आहे. ‘सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी, सक्षम भविष्य’ हे ब्रीदवाक्य घेऊन राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत पोलिसांच्या पथकांनी जिल्ह्यातील सुमारे ३ हजार शाळांना प्रत्यक्ष भेट देत तब्बल २ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानात पोलिसांनी पारंपरिक चौकटीपलीकडे जात विद्यार्थ्यांशी ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ या स्नेहपूर्ण भूमिकेतून संवाद साधला. त्यामुळे पोलिसांविषयी असलेली भीती कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये विश्वास आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करण्यास मदत झाली. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘गुड टच-बॅड टच’, मुलींची सुरक्षितता, तसेच पोक्सो कायद्यातील तरतुदी आणि अडचणींच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधण्याची पद्धत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संवादाचा हा पूल भविष्यातील सुरक्षित समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी पोलीस दलाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आधुनिक पोलिसिंगला प्राधान्य दिले आहे. गुन्ह्यांचा तपास, त्यांचे विश्लेषण आणि न्यायालयीन निकालांचे मूल्यमापन अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘राईड’ या अॅपचा वापर करण्यात येत आहे. गुन्ह्यांचे विश्लेषण करण्याबरोबरच दोषसिद्धी झालेली तसेच निर्दोष सुटका झालेली प्रकरणे यांची अचूक माहिती आणि समरी तयार करण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन रॅपिड’ या विशेष अॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसिंग अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘मिशन प्रतिसाद’, ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी व सुरक्षेसाठी ‘मिशन जीवन’, तसेच ‘मिशन प्रगती’, ‘मिशन परिपूर्ती’, ‘मिशन पोलीस पाटील’, ‘मिशन सायबर जागृती’, ‘मिशन ग्राम सुरक्षा’, ‘मिशन नवी दिशा’, ‘मिशन आरोग्य’ आणि ‘मिशन जागरूक नागरिक’ यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेबरोबरच सामाजिक सुरक्षिततेलाही केंद्रस्थानी ठेवले आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून नागरिकांच्या तातडीच्या मदतीपर्यंत आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगपासून सामाजिक प्रश्नांच्या निराकरणापर्यंत विविध आघाड्यांवर रत्नागिरी पोलीस दलाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेसोबतच नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून अधोरेखित होत आहे.
मोकाट गुरांच्या प्रश्नावर सामूहिक पुढाकाराची गरज
दरम्यान, जिल्ह्यातील रस्त्यांवर वाढत असलेल्या मोकाट गुरांच्या समस्येवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्थानिक सामाजिक संस्था आणि सजग नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोकाट गुरांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.

