(रत्नागिरी / वार्ताहर)
जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि कृषी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी आणि खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालयात हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि ओंकार अॅग्रोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी विविध कृषी यंत्रसामग्रीची माहिती व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आधुनिक कृषी यंत्रांची कार्यपद्धती, त्यांचा शेतीतील उपयोग तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यामध्ये होणारी बचत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध कृषी यंत्रे प्रत्यक्ष हाताळून पाहिली तसेच त्यांच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकतेने प्रश्न विचारले. आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका, यंत्रांच्या माध्यमातून शेती अधिक सुलभ व कार्यक्षम करण्याचे मार्ग आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
यावेळी निहार वैद्य यांनी आधुनिक यांत्रिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. शेतीतील वाढते यांत्रिकीकरण, श्रम व वेळेची बचत, कार्यक्षम नियोजन तसेच आधुनिक कृषी यंत्रांच्या वापरातून शेती अधिक सुलभ आणि उत्पादक कशी करता येते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुमित कुळे, प्रोजेक्ट असोसिएट (Agriculture), जलजीविका यांनी पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतींमधील बदल तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. कृषी क्षेत्र हे केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून कृषी तंत्रज्ञान, संशोधन, कृषी अभियांत्रिकी, उद्योजकता, अॅग्री-बिझनेस यांसह अनेक आधुनिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
“शेती म्हणजे केवळ शेतात काम करणे नव्हे; अन्न, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समाज या सर्वांचा शेतीशी थेट संबंध आहे,” हा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. भविष्यात डॉक्टर, अभियंता, उद्योजक, अधिकारी किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी जाण व आदर बाळगणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कृषी यंत्रे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आधुनिक शेतीविषयी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि करिअरच्या संधींचे क्षेत्र म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड, खेडशी महालक्ष्मी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष पाटील, रोटरी क्लबचे सचिव आनंद चौगुले, माजी शिक्षक व केंद्रप्रमुख तथा वरिष्ठ रोटरी सदस्य विनायक हातखंबकर, मंदार सावंतदेसाई, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापिका आर्वी पाटील यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.

