(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शाळेची वेळ असताना अध्यापनाचे कर्तव्य बाजूला ठेवून पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद कार्यालयात विनाकारण फिरणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना आता चाप बसणार आहे. कार्यालयीन वेळेत कामाशिवाय शाळेबाहेर आढळल्यास संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अलीकडच्या काळात काही शिक्षक व मुख्याध्यापक शाळेच्या वेळेत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालयात चकरा मारताना आढळून येत असल्याच्या तक्रारी पालक आणि ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठींसाठी अध्यापनाचा वेळ खर्ची पडत असल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. विशेषतः दुपारनंतर जिल्हा परिषद भवनातील दुसऱ्या मजल्यावर शिक्षकांचे घोळके दिसून येत असल्याची बाबही चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षणाचा दर्जा यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशी भूमिका सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यानंतर शाळेच्या वेळेत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, विविध समित्यांचे सभापती, सदस्य, खातेप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या निर्णयामुळे अध्यापनाच्या वेळेत शाळेबाहेर फिरण्याच्या प्रकाराला आळा बसेल आणि शिक्षकांचे लक्ष पुन्हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे केंद्रित होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी कार्यालयीन दालनांऐवजी वर्गखोल्यांमध्ये अधिक वेळ द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
‘पाठांतर’ पुन्हा केंद्रस्थानी
मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील पाठांतराची सवय कमी होत असल्याची चिंता स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. स्मरणशक्ती आणि अभ्यासाची सवय दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे पाठांतरावर भर देण्यात यावा, अशी सूचना शिक्षण विभागाला करण्यात आली. यासाठी पदाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांचे पाठांतर, अभ्यासाची पद्धत आणि शैक्षणिक प्रगती यांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकापुरता अभ्यास न राहता विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक क्षमतांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लहान मुलांना ऑनलाइन अभ्यासाला ‘ब्रेक’
मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या अभ्यासाच्या सवयींवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाची आवश्यकता होती; मात्र आता नियमित शाळा सुरू असल्याने लहान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास देणे टाळावे, अशी भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. मोबाइलपासून विद्यार्थ्यांना शक्य तितके दूर ठेवून प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, शिक्षक-विद्यार्थी संवाद आणि अभ्यासाची शिस्त यांना प्राधान्य देण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

