(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील कुवारबाव येथील पत्रकार कॉलनीत २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एका तरुणावर प्रेमसंबंधाच्या संशयातून घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या सर्व प्रकाराबाबत आनंद आकाराम घोडके (वय ४४, रा. पत्रकार कॉलनी) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रात्री झोपेत असताना दत्ता बिरा यमगर, अशोक बिरा यमगर, आकाश शामराव रुकनर आणि स्नेहल आनंद घोडके यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला. आरोपी दत्ता यमगर याला फिर्यादीचा त्याच्या पत्नी रुक्मिणी दत्ता यमगर हिच्याशी कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
या संशयातून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या ठोश्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यानंतर आरोपी अशोक यमगर याने लाकडी बॅटने घोडके यांच्या डोक्यात व कपाळावर घाव घातला. तसेच, ठार मारण्याची धमकीही दिली गेली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या घोडके यांना उपचारासाठी २३ एप्रिल रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार दत्ता यमगर, अशोक यमगर, आकाश रुकनर आणि स्नेहल घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.