(विशेष /प्रतिनिधी)
गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिककेंद्री पोलीसिंगला प्राधान्य देत प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १०० सर्वोत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत समावेश झाला आहे. देशभरातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांचे नाव झळकल्याने जिल्ह्याच्या पोलीस दलासह नागरिकांमधूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे, महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, सायबर आणि संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध करणे, वाहतूक व्यवस्थापन तसेच संकटाच्या प्रसंगी तत्पर प्रतिसाद देणे, अशा विविध निकषांवर देशातील पोलीस प्रमुखांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात आले. या व्यापक प्रक्रियेत नितीन बगाटे यांची निवड होणे ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ यांच्या वतीने करण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत अधिकृत आकडेवारी, प्रशासकीय नोंदी, माध्यमांमधील वृत्तांकन, तज्ज्ञांचे मत, सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहिती तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील अभिप्राय यांचा विचार करण्यात आला. गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेतील सुधारणा यांसोबतच नागरिकस्नेही पोलीसिंग, प्रशासनातील पारदर्शकता, नाविन्यपूर्ण उपक्रम, दबावाच्या परिस्थितीत निर्णयक्षमता, संकट व्यवस्थापन, जनतेशी संवाद आणि सार्वजनिक प्रतिमा अशा विविध बाबींचे परीक्षण करण्यात आले.
देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील जिल्हा पोलीस प्रमुख आणि प्रमुख पोलीस पथकांचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांमधून ही निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून नितीन बगाटे यांच्यासह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे. ‘फेम इंडिया’चे संपादक धीरज कुमार यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना, समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या प्रशासक आणि लोकसेवकांच्या कार्याला व्यासपीठ देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. देशभरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या असंख्य अधिकाऱ्यांमधून केवळ १०० अधिकाऱ्यांची निवड करणे ही आव्हानात्मक प्रक्रिया असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, ही निवड प्रक्रिया याच टप्प्यावर थांबणार नसून पुढील टप्प्यात या १०० अधिकाऱ्यांमधून भारतामधील २५ सर्वोत्कृष्ट पोलीस प्रमुखांची निवड करण्यात येणार आहे. या २५ अधिकाऱ्यांना विशेष सन्मानही प्रदान केला जाणार असून, आगामी अंकात त्यांची विशेष नोंद प्रसिद्ध केली जाणार आहे.
रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिकांशी समन्वय, तातडीने प्रतिसाद आणि प्रभावी पोलीस प्रशासन यांना विशेष महत्त्व असते. अशा पार्श्वभूमीवर नितीन बगाटे यांचा देशातील १०० उत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत झालेला समावेश हा रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. या सन्मानामुळे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासोबतच नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमांतून लोकाभिमुख पोलीसिंगला बळ
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी पारंपरिक पोलिसिंगसोबत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची सांगड घातली. ‘मिशन प्रगती’, ‘मिशन प्रतिसाद’, ‘मिशन संवेदना’, ‘मिशन परिपूर्ती’, ‘मिशन फिनिक्स’, ‘मिशन गस्त’, ‘डिजिटल गाववारी’, ‘रत्नसेतू’ चॅटबॉट आणि ‘स्वॅम्प पोलीस’ अशा उपक्रमांमधून नागरिकांशी थेट संवाद, तक्रारींचा पाठपुरावा, महिला-बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य, अमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि दुर्गम भागातील पोलिसिंग अधिक सक्षम करण्यात आले. सन २०२५ मध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि उकल, मालमत्ता गुन्ह्यांतील मुद्देमालाची वसुली तसेच अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधातील कारवाईतही जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
यामध्ये विशेष म्हणजे, ई-गव्हर्नन्सच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत राज्यातील ३४ सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये पाचवे स्थान मिळवले आणि त्याबद्दल नितीन बगाटे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे. आता देशातील १०० उत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत नाव झळकवल्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

