( दापोली/ वार्ताहर )
सासू घराबाहेर गेल्याची संधी साधत जावयानेच तिच्या घरातून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे घडली. या प्रकरणाचा तपास करताना दापोली पोलिसांनी सासूच्या संशयावरून तिच्या जावयाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्याची पोलिसांची माहिती असून, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालगड-कातळवाडी येथे राहणाऱ्या शुभांगी विष्णू दळवी या ११ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.४५ ते ९.१० या वेळेत घराला कुलूप लावून गुरे चारण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. याच कालावधीत अज्ञात व्यक्तीने घराच्या मागील बाजूच्या किचनमधील स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरून नेण्यात आली.
या पर्समध्ये सोन्याचे दागिने असल्याचे दळवी यांनी पोलिसांना सांगितले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ८ लाख ९० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात दळवी यांनी आपले जावई विजय जयराम नामूगडे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.
तक्रार दाखल होताच दापोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विजय नामूगडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सासूच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी विजय जयराम नामूगडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे करत आहेत.

