(रत्नागिरी / वार्ताहर)
कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. कुटुंबीयांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचता आले. नगराध्यक्ष म्हणून काम करताना अधिकाधिक लोकहिताची कामे करण्याला आपला प्राधान्यक्रम राहणार असल्याचे मत रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी व्यक्त केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी नगर परिषदेत घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘आपण साऱ्याजणी’ हे भित्तीपत्रक प्रकाशित केले जाते. यासाठी राज्यशास्त्र विभागातील प्रथम व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘NEP-2020’ अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची मुलाखत घेतली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर महिला विकास कक्षाच्या समन्वयिका डॉ. सोनाली कदम यांच्या हस्ते नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सहकार वार्षिकांक देऊन स्वागत करण्यात आले.
मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी नगराध्यक्षा आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सुरू असलेले विविध उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यपद्धती, महिलांचे राजकीय सक्षमीकरण आणि प्रशासनातील अनुभव यांसह विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुर्वे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील विविध टप्पे, आलेल्या आव्हानांचा सामना आणि कुटुंबीयांकडून मिळालेला पाठिंबा याबाबतही माहिती दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधीशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी घेतलेली ही मुलाखत ‘आपण साऱ्याजणी’ या भित्तीपत्रकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यावेळी महिला विकास कक्षाच्या समन्वयिका डॉ. सोनाली कदम, सदस्य प्रा. बी. डी. सुतार, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील, प्रा. अक्षय झोरे यांच्यासह राज्यशास्त्र विभागातील प्रथम व तृतीय वर्षाचे ३२ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सोनाली कदम यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

