( मुंबई / वृत्तसंस्था )
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर पूर्व परिसरात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. घाटकोपर पूर्व येथील गौसिया चाळ परिसरात रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास डोंगराची दरड अचानक कोसळून चाळीतील काही घरांवर मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन ते चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. तसेच सात ते आठ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडली त्यावेळी परिसरातील नागरिक गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज झाल्यानंतर डोंगराचा भाग खाली असलेल्या घरांवर कोसळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी आणण्यात आली असून बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून धोकादायक भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले आहेत का, याचा शोध बचाव पथकांकडून घेतला जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत तपशील स्पष्ट होणार आहे.

