(दापोली / वार्ताहर)
दापोली शहरातील काळकाई कोंड-नागरबुडी परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची संरक्षक बांध कोसळून घराच्या पडवीचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. महेंद्र घाणेकर यांच्या घरालगत असलेली संरक्षक बांध मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. त्यानंतर मातीचा मोठा ढिगारा तसेच दगड घराच्या दिशेने वाहून आल्याने त्यांच्या पडवीचे नुकसान झाले. दापोली परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ, नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका अश्विनी लांजेकर, नगरसेविका प्रीती शिर्के, उपशहरप्रमुख दीपक सूर्यवंशी, नगरपंचायतीचे अभियंता सुनील सावके तसेच कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात आणि पावसाचा जोर सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
अधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच परिसरातील धोकादायक भागाची पाहणी करून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी नगरपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

