( नवी दिल्ली )
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविनाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, गुरुवारी मोदी यांनी राज्यसभेत या प्रस्तावावर सविस्तर भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारताची वाटचाल वेगाने विकासाच्या दिशेने सुरू असल्याचा दावा करत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा स्पष्ट स्वर संसदेत उमटल्याचे सांगितले. २१व्या शतकाची पहिली तिमाही पूर्ण झाली असून, आता दुसरी तिमाही ही ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मोदी म्हणाले. आज भारत जागतिक स्तरावर केवळ आव्हानांना सामोरे जाणारा नाही, तर त्यावर उपाय सुचवणारा आणि जगाला आशेचा किरण दाखवणारा देश बनल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा जीडीपी मोठ्या प्रमाणात वाढला असून, यावरून देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत झाली आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. सध्याची विकासगती कायम राहिली, तर लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांत भारताची दमदार वाटचाल सुरू असून, भारताचा जागतिक प्रभाव सातत्याने वाढत असल्याचे मोदी यांनी सांगितले. याच भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांवर जोरदार टीका केली, ज्याला काँग्रेसकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले.
दरम्यान, जागतिक घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या जग नव्या ग्लोबल ऑर्डरच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी जागतिक व्यवस्था निर्माण झाली होती, त्यानंतर आता नवी वर्ल्ड ऑर्डर आकार घेत असून तिचा कल भारताच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. एक विश्वासू जागतिक भागीदार म्हणून भारत अनेक देशांसाठी व्यापाराच्या क्षेत्रात महत्त्वाचा ठरत असून, अलीकडच्या काळात भारताने जगातील ९ प्रमुख देशांसोबत महत्त्वाचे ट्रेड डील केले आहेत. यामध्ये ‘मदर ऑफ ऑल डील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराराचाही समावेश असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या या भाषणानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मोदींवर पलटवार केला. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मोदीजी सत्यामुळे इतके घाबरले की, त्यांनी लगेच असत्याचा आधार घेतला. असो, त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे मोदींच्या राज्यसभेतील भाषणानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले.

