(गणपतीपुळे / वैभव पवार)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र-पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सन २०२५/२६ मधील जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जी.एम्.शेटये हायस्कूलची इयत्ता १०वी मधील विद्यार्थीनी व बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५, बसणीचे माजी सचिव व नालंदा प्रतिष्ठान बसणीचे विद्यमान कोषाध्यक्ष योगेश यशवंत कदम यांची कन्या समृध्दी योगेश कदम हिने वजनी मोठा गट या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून हायस्कूलचे नाव उज्वल केले आहे.
समृध्दी च्या चमकदार कामगिरीमुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल समृध्दी व तिला मार्गदर्शन करणारे श्री.जाधव सर यांचे बसणी गावातून आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५ बसणी यांचे वतीने अभिनंदन करून पुढील दैदीप्यमान वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. समृद्धीने अभ्यासाप्रमाणेच आपल्या आवडीच्या खेळात अतिशय गुणवान व मेहनती खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवले असून तिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. तिच्या या अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरीमुळे संपूर्ण बसणी गावातून आणि क्रीडा प्रेमी नागरिकांकडून तिचे विशेष कौतुक होत आहे.

