(रत्नागिरी / वार्ताहर)
देवरुख तालुक्यातील हातीव येथील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री विलास दिनकर कदम (वय ६८) यांना आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्याने निओ मोशनची यांत्रिक व्हीलचेअर गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मदतीमुळे त्यांच्या जीवनात नव्या आशा आणि उत्साहाचा संचार झाला आहे.
लहानपणीच, दीड वर्षांचे असताना पोलिओमुळे त्यांच्या पायांना गंभीर बाधा झाली. सहाव्या वर्षी त्यांच्यावर पायाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पायांना कॅलिपर आणि कुबड्यांच्या साहाय्याने त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला. हातीव आणि मुंबई येथे शिक्षण घेत त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचा प्लास्टिक पेपर तयार करण्याचा व्यवसाय असून, त्यामध्येही त्यांनी हातभार लावला.
वयाच्या ३२ व्या वर्षी विवाह झाल्यानंतर त्यांनी संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांना दोन मुले आहेत. स्वतः दिव्यांग असूनही त्यांनी समाजासाठी काम करण्याचा ध्यास घेत देवरुख येथे “उत्कर्ष बहुविकलांग पुनर्वसन संस्था” सुरू केली. या संस्थेमार्फत दिव्यांगांना मोफत कृत्रिम साधने उपलब्ध करून देणे, पुनर्वसन शिबिरे आणि मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
अशाच एका शिबिरादरम्यान त्यांची आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडे यांच्याशी ओळख झाली. वाढते वय आणि चालण्यातील अडचणी लक्षात घेऊन फाउंडेशनने त्यांच्यासाठी निओ मोशन इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मागील आठवड्यात त्यांना ही यांत्रिक व्हीलचेअर प्राप्त झाली.
या व्हीलचेअरमुळे आता त्यांना हातीव ते देवरुख असा प्रवास करून संस्थेच्या कामासाठी सहज ये-जा करता येत आहे. घराबाहेर पडून लोकांशी संपर्क वाढल्याने त्यांच्या जगण्याला नवी उभारी मिळाली असून, दिव्यांगांसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री विलास कदम यांनी निओ मोशनची यांत्रिक व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल आर एच पी फाउंडेशन तसेच श्री सादिक करीम नाकाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

