(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली येथील श्री विठ्लादेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अंध आणि दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वरश्री प्रतिष्ठान, मुंबई निर्मित “आनंदयात्री” या कार्यक्रमात अंध आणि दिव्यांग कलाकार आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. मराठी आणि हिंदी गीतांनी सजलेली ही रंगारंग मैफल रसिकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमातून जिद्द, आत्मविश्वास आणि कलेची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार असून, दिव्यांग कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. सदर कार्यक्रम शनिवार, दि. १० मे २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता श्री विठ्लादेवी मंदिर, कर्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कर्ली विद्यावर्धक आणि ग्रामविकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

