( राजापूर )
कणकवली तालुक्यातील फोंडा उंबरट फाटा येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात राजापूर शहरातील तरुण अमान गनी खतीब (वय 21) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सुमारे 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली.
राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा अमान हा सुपुत्र असून तो कामानिमित्त सकाळी दुचाकीने सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीकडून राजापूरकडे परतत असताना फोंडा उंबरट फाटा येथे त्याच्या दुचाकीची पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की अमानचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर शहरातील व्यापारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी घटनास्थळी व कणकवलीकडे धाव घेतली. अमानच्या अकाली मृत्यूमुळे खतीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमानच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा तो पुतण्या होता. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

