(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल येथे होणार की रायपाटण येथे, याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर विविध अफवा पसरवून पूर्व भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रम तेलंग यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तेलंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचल सक्षम होते, पाचल सक्षम आहे आणि पाचलच सर्वाधिक योग्य ठिकाण राहणार आहे. ५२ हून अधिक शासकीय कार्यालये व सेवा असलेले पाचल हे या परिसराचे प्रशासकीय केंद्र म्हणून अनेक वर्षांपासून ओळखले जाते. यापूर्वी नायब तहसीलदार कार्यालयाचे कामकाजही येथे यशस्वीपणे पार पडले आहे. त्यामुळे पाचलच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही.”
ते पुढे म्हणाले, “पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी पाचल हे सहज पोहोचण्याजोगे आणि कमी खर्चाचे केंद्र आहे. अशा परिस्थितीत कार्यालय अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला बाधा आणणारा ठरेल.”
“आज आपल्या हक्काच्या ठिकाणाहून अप्पर तहसीलदार कार्यालय अन्यत्र नेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की सरकारी यंत्रणा ही जनतेच्या सोयीसुविधांसाठी असते, त्यांना अडचणीत आणण्यासाठी नव्हे. अशा चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण अतिरिक्त प्रवास व खर्चाचा सामना करावा लागू शकतो.
म्हणूनच पाचलच्या या न्याय्य मागणीसाठी गावागावांतील तरुण, कष्टकरी शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकजुटीने उभे राहून शासनापर्यंत आपला ठाम, एकसंघ आणि बुलंद आवाज पोहोचवावा. लोकहिताच्या या लढ्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे विक्रम तेलंग यांनी म्हटले आहे.

