( नवी दिल्ली )
राजधानी नवी दिल्ली येथे डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणात रुग्णाचा जीव वाचवत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रुग्णाच्या अन्ननलिकेत दातांची कवळी अडकल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास, घशात तीव्र वेदना आणि गिळताना अडचण जाणवू लागली. प्रकृती खालावत गेल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत डॉक्टरांना आढळले की, दातांची कवळी अन्ननलिकेत खोलवर अडकली असून त्यामुळे आसपासच्या संवेदनशील भागाला इजा होत होती.
शस्त्रक्रियेविना उपचाराचा निर्णय
डॉक्टरांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मोठी शस्त्रक्रिया टाळून ही कवळी सुरक्षितपणे काढणे. कारण ओपन सर्जरीमुळे रक्तस्राव, संसर्ग आणि इतर गंभीर गुंतागुंतींचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी आधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेदरम्यान, एंडोस्कोपिक मार्गदर्शनाखाली अॅडव्हान्स लेझर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. डॉक्टरांनी दातांच्या कवळीचे लहान तुकडे करून ते काळजीपूर्वक एक-एक करून बाहेर काढले. अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत, वरच्या भागात संरक्षक ओव्हरट्यूब बसवण्यात आली. यामुळे तीक्ष्ण तुकड्यांपासून ऊतींचे संरक्षण करण्यात यश आले.
डॉक्टरांच्या मते, ही प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. कवळीचा काही भाग अन्ननलिकेच्या भिंतीत अडकलेला असल्याने कोणतीही चूक झाल्यास छिद्र पडणे किंवा गंभीर रक्तस्राव होण्याची शक्यता होती. यशस्वी प्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे. योग्य वेळी रुग्णालयात दाखल होणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेतून आणि जीवघेण्या गुंतागुंतीतून रुग्ण बचावला, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गिळताना अडचण, घशात वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर धोके टाळता येऊ शकतात.

