(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेले आहे. “जाता पंढरीशी सुख लागे जीवा” या संतवचनाचा प्रत्यय देत राज्यासह देशभरातून आलेल्या 20 लाखांहून अधिक वारकरी आणि भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत आज हजेरी लावली आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड जयघोष आणि चंद्रभागा नदीच्या तीरावर उसळलेला भक्तिसागर यामुळे संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. यंदाच्या यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने राज्य शासनाने व्यक्त केलेला 35 लाख भाविकांच्या आगमनाचा अंदाज प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि लाखो वारकरी-भाविकांच्या साक्षीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा विधिवत पार पडली. यंदाच्या शासकीय महापूजेसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने या मानाच्या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. विठुरायाच्या चरणी राज्याच्या सुख-समृद्धी, भरघोस पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण आणि सर्व नागरिकांच्या मंगलमय आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची पारंपरिक शासकीय महापूजा मानाच्या वारकरी दांपत्यासमवेत विधिवत केली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारीच पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक आणि शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण राज्याच्या वतीने विठुरायाच्या चरणी सुख, समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या आणि हजारो दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण शहर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी इसबावी परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने सरकत असताना पावसानेही हजेरी लावल्याने वारकऱ्यांच्या उत्साहात आणखी भर पडली. राज्यासह परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे चंद्रभागा नदीचा परिसर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्ती मार्ग आणि प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी अक्षरशः फुलून गेला आहे.
पहाटेपासूनच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे धाव घेतली. यात्रेपूर्वी चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी सोडण्यात आल्याने भाविकांना स्नानाचा लाभ मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात स्पीड बोटी, सुमारे 200 होड्या आणि जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली आहेत. चंद्रभागा स्नान करून नामदेव पायरीमार्गे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मुखी “विठ्ठल विठ्ठल”चा अखंड गजर सुरू असल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
यंदा भाविकांची संख्या विक्रमी वाढल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठीची रांग तब्बल 15 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. दर्शन रांग गोपाळपूरमार्गे रांझणी रस्त्यापर्यंत गेली असून चार लाखांहून अधिक भाविक रांगेत उभे आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 18 तासांचा, तर मुखदर्शनासाठी 5 ते 34 तासांचा कालावधी लागत आहे. मंदिर समितीने पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन आणि शिखर दर्शनासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली असून भाविकांच्या सोयीसाठी 20 दर्शन शेड उभारले आहेत. तरीही वाढत्या गर्दीमुळे अतिरिक्त पत्राशेडही अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य भाविकांना समान संधी मिळत असली तरी दर्शन रांग अधिक लांबली आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, मंदिर समिती, पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि विविध शासकीय विभागांनी गेल्या दोन महिन्यांपासून व्यापक नियोजन केले आहे. सुमारे 10 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे सतत निगराणी ठेवली जात आहे. वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 5,500 अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत असून खासगी वाहनांसाठी 18 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या आगमनामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
भक्तांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेल्या 65 एकरांच्या भक्तीसागरात सहा लाखांहून अधिक वारकरी वास्तव्यास आहेत. तंबू, राहुट्या आणि भक्तनिवासांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताह सुरू असून संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला आहे. शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा आणि भक्त निवास पूर्ण क्षमतेने भरले असून अनेक भाविकांनी उपलब्ध जागांवर तात्पुरते तंबू उभारून मुक्काम केला आहे.
आरोग्य विभागाने वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर दर्शन रांग तसेच 65 एकर भक्तीसागर परिसरात महाआरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. हजारो भाविक या आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत. याशिवाय 6,813 शौचालये, महिला स्नानगृहे, रुग्णवाहिका, औषधोपचार केंद्रे आणि मुख्यमंत्री सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रांमध्ये भाविकांसाठी निवारा, विश्रांती, फूट मसाज आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या विक्रमी गर्दीमुळे प्रसाद, पूजासाहित्य, धार्मिक वस्तू, खाद्यपदार्थ, निवास व्यवस्था आणि स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळाली आहे. व्यापारी वर्गाने यंदा यात्रेमुळे विक्रमी उलाढाल होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने पंढरपूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने अक्षरशः दुमदुमून गेली असून, आषाढी एकादशीचा महासोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

