(रत्नागिरी / जिमाका)
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारां’साठी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी विविध प्रवर्गांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र निर्यातदारांनी विहित नमुन्यातील अर्ज ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
या पुरस्कार योजनेंतर्गत विविध प्रवर्गांमध्ये ३४ सुवर्ण आणि ३२ रजत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या सुवर्ण पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र, तर द्वितीय क्रमांकाच्या रजत पुरस्कारासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
कोणाला करता येणार अर्ज?
निर्याताभिमुख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापारी निर्यातदार (Merchant Exporters), ट्रेडिंग हाऊस, एक्सपोर्ट हाऊस, सेवा निर्यातदार तसेच महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उत्पादक निर्यातदारांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी व्यतिरिक्त (Non-Engineering) ODOP-GI निर्यातदारांचाही यामध्ये समावेश आहे.
रत्न व दागिने, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत उत्पादने, अभियांत्रिकी व वाहन उद्योग, रसायने व संलग्न उत्पादने, औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधने, प्लास्टिक उत्पादने, लोखंड व पोलाद, वस्त्रोद्योग व चामड्याशी संबंधित उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, मत्स्य व सागरी उत्पादने, IT व ITES, पर्यटन, आदरातिथ्य व वेलनेस, शिक्षण, पायाभूत सुविधा, बांधकाम, फिनटेक, BFSI तसेच मीडिया व मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील निर्यातदारांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.
निर्यातीचे मूल्य व निकष
MSME घटकांसाठी परकीय चलनाच्या संदर्भात निर्यातीचे एकूण FOB (Free on Board) मूल्य किमान २ कोटी रुपये असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी निर्यातदारांची निर्यात उत्पादनाशी असलेले गुणोत्तर, निर्यातीतील सातत्यपूर्ण वाढ, नवीन बाजारपेठांचा विकास, नवीन उत्पादनांची निर्यात तसेच आव्हानात्मक परदेशी बाजारपेठेत मिळवलेले यश यांसारख्या बाबींचा विचार केला जाणार आहे. याशिवाय हरित उपक्रमांचा अवलंब करणाऱ्या निर्यातदारांच्या कामगिरीचाही पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.
ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा
पात्र निर्यातदारांनी आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी खालील ई-मेलवर पाठवावेत :
diexport@maharashtra.gov.in
didic.ratnagiri@maharashtra.gov.in
विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

