(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामांमधील गंभीर निष्काळजीपणामुळे संगमेश्वर येथे सोमवारी रात्री धोकादायक अपघात घडला. पारेख पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्ता आणि बाजूच्या कच्च्या रस्त्यामध्ये ठेवलेली दीड ते दोन फुटांची उंचीची दरी वाहनांसाठी ‘डेथ ट्रॅप’ ठरली. या ठिकाणी एका अवजड वाहनाचा तोल जाऊन ते अर्धवट हवेत लटकले, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
महामार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्याने सध्या दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, पूर्ण झालेला रस्ता आणि बाजूचा कच्चा मार्ग यामध्ये मोठा उंची फरक ठेवून कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता तो खुला ठेवण्यात आला आहे. अपघातग्रस्त वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे दृष्टी क्षणभर झाकोळली. त्याच वेळी साईड देताना वाहन रस्त्याच्या कडेला उतरले आणि उंचीच्या फरकामुळे अर्धवट हवेत अडकले.
या ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक असते, तर अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया चालकाने दिली. सुरक्षा साधनांचा पूर्ण अभाव असल्याने रस्ता नेमका कुठे संपतो याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर महामार्गावर दोन्ही बाजूंना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली. मध्यरात्रीच्या वेळी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. संतप्त प्रवाशांनी आणि स्थानिकांनी ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, आरवली ते कांटे या दरम्यान यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून त्यात जीवित व वित्तहानी झाली आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही सुधारणा होत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
अपघातानंतर ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी मदतीला उपस्थित नव्हता. अखेर स्थानिक नागरिक, प्रवासी आणि पोलिसांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दोन ते अडीच तास प्रयत्न करून वाहन बाजूला केले. रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
ही घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणामुळे निर्माण झालेला गंभीर धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

