(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील सौंदळ मुस्लिमवाडी येथून ३० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
शबनम युसूफ पाटणकर (वय ३०, रा. सौंदळ मुस्लिमवाडी, ता. राजापूर) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. पोलिस नोंदीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजेपर्यंतच्या कालावधीत ती घरातून निघून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने ९ ऑगस्ट रोजी राजापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिस नोंदीनुसार, शबनम यांच्यावर रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरू असून, त्या यापूर्वीही घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी राजापूर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याच्या दोन नोंदी करण्यात आल्या होत्या. एप्रिल २०२६ मध्येही त्या बेपत्ता झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी स्वतःहून घरी परतल्या होत्या.
बेपत्ता महिलेचे वर्णन गोरी, अंगाने सडपातळ, उभट चेहरा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, केस काळे व लांब असे आहे. बेपत्ता होताना तिने लाल रंगाचा अनारकली ड्रेस व निळ्या रंगाची ओढणी परिधान केली होती. ती मोबाईल वापरत नसल्याचेही पोलिस नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वरील तपशिलानुसार कोणाला सदर महिला आढळल्यास राजापूर पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

